कोकण मराठी साहित्य परिषदेचं उत्कृष्ट कथासंग्रह पारितोषिक विजेतं पुस्तक – मेल्टिंग पॉट

कथा सारांश:

अंतरायmp_cover
ऑस्ट्रेलियाहून सुट्टीसाठी आलेल्या शमिकाची अचानक कॉलेजच्या मैत्रिणीशी गाठ पडते. मैत्रिणी ठरवून धमाल करण्यासाठी एकत्र भेटतात. शमिका आणि रंजन तर शाळेपासून एकत्र शिकलेल्या. त्या दोघी सांगोल्याला जायचं नक्की करतात. तिथे पोचल्यावर आता पन्नाशीला पोचलेल्या शाळूसोबत्याची गाठ पडते. मधली वर्ष कथा, कहाणी बनून समोर येतात.
शमिकाने सांगोल्यातलाच तिचा परममित्र दहा वर्षापूर्वी अपघातात गमावलेला असतो. इतक्या वर्षानी त्याच्या घरातल्याना भेटताना अस्वस्थ शमिका तुषारच्या भावाच्या वागण्याने चकित होते. परत निघताना तिच्या मनाचा निर्णय पक्का होतो. अंत:करण पिळवटून टाकणारी कहाणी.


उल्लंघन
दोन जीवलग मित्रांची कहाणी. बेफिकीर ब्रायन आणि संवेदनशील क्रिस जंगलात भटकायला गेलेले हे मित्र दुर्देवाने रस्ता चुकतात. रात्रीच्या भयाण शांततेत गप्पा रंगतात. वर्षानुवर्ष शेजारी रहात असूनही एकमेकाच्या कौटुंबिक घडामोडीबद्दलची अनभिज्ञता त्यांना आश्चर्यचकीत करते. जसजशी रात्र चढत जाते तसतसा ब्रायन अस्वस्थ व्हायला लागतो. हळूहळू क्रिस सगळी सूत्र हातात घेतो. दोघांमधले संबध ताणले जातात. क्रिसच्या मानसोपचारतज्ञाकडच्या खेपेचं कारण प्रथमच ब्रायनला समजतं तर वरवर बेफिकिर वाटणारा ब्रायन किती भित्रा आहे हे क्रिसच्या लक्षात येतं. तहानभुकेने ब्रायन आजारी पडतो. सुटकेची लक्षणं दिसत नाहीत म्हटल्यावर शेवटी स्वत:ला मारुन टाकण्याची भीक क्रिसकडे मागतो.
क्रिसच्या हातातल्या ब्रायनच्या आयुष्याच्या दोरीचं काय होतं?


पिपासा
सीमेवर घडलेली ही सत्यघटना. शाळकरी मुलींना सैनिकांच्या भुकेसाठी पुरवठा करण्याची जबाबदारी स्विकारलेला कंत्राटदार आणि स्व:ताच्या मुलीसकट सगळयांची या सैनिकांपासून सुटका करण्यासाठी धडपडणार्‍या, तोंड बंद ठेवण्यासाठी होउ शकणारी मुलीची सुटका नाकारत वरपासून, खालपर्यंत सडलेल्या यंत्रणेची पाळंमुळं उखडून काढणार्‍या एका धारिष्ठ्यवान स्त्रीच्या लढयाची ही कहाणी. सत्यघटनेवर आधारित कथा.


त्या दोघी
त्या दोघी! उच्चशिक्षित मायलेकी. परदेशात येवून तिथल्या परिक्षेच्या भाराखाली दबलेली, नोकरी करता येत नाही या दु:खाने व्यथित; नवर्‍यामुलांवर चिडचिड करणारी मुलगी आणि तीस वर्षापूर्वी डॉक्टरीचा मोह सोडून नवर्‍याबरोबर परदेशात स्थायिक झालेली तिची आई.
दोघींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि दोघींमधल्या नात्याचा सुंदर गोफ


वर्तुळाचे टोक
सुदेश, रिमा आणि स्वाती. विचित्र नात्याच्या धाग्यात विरुन गेलेले तीन जीव. त्या नात्यातल्या एकेक धाग्याचा अर्थ शोधण्यात गुंतलेले. सुदीपच्या जन्माने तिघं जवळ आल्यासारखे वाटत असतानाच नियती कल्पनेपलीकडच्या सत्याला सामोरं जाणं भाग पाडते. या वर्तुळाच्या टोकात सामील होते सुमुखी….काय घडतं सुदेशच्या संसांरात?


एकटी
ती अमेरिकेत नवर्‍याबरोबर येते. दोन वर्षानी परत जाण्याची इच्छा बाळगत… ही दोन वर्ष कधीच संपत नाहीत. भारतातल्या प्रत्येक भेटीत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय ही जाणीव तिचं मन पोखरत रहाते. कितीही नाकारलं तरी आपण काठावर उभे आहोत ही भावना नष्ट होत नाही. ती अलिप्त होते. अचानक भारतात परत जायचं म्हणून अमेरिकेतही अलूफ राहीलेली ती आमुलाग्र बदलते. वर्ष जातात. तिचा चिमुकला पंख फुटून भरारी मारायला लागतो. त्याच्यासाठी म्हणून कराव्या लागणार्‍या गोष्टींची गरज उरलेली नसते. पुन्हा एकदा तिचं मन उचल खातं. परत जाण्याची इच्छा बळावते. ती मुलाशी आणि त्याच्या बाबांशी बोलून आपला निर्णय सांगायचंं ठरवते.
काय होतं पुढे? वाचा ‘एकटी’ या कथेत!


कालचक्र
“अॅना मी लहान पडते तुझ्यापेक्षा, पण रोज सांगते तेच पुन्हा सांगते आपल्या समाजाचे नियम पाळायलाच हवेत. बाहेरच्या जगाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, तसचं तिथल्या माणसांशीही. जेकबशी लग्नं होणार या वेडया आशेवर असशील तर सावर स्वत:ला. अजून हे तुझ्या माझ्यातच आहे तोपर्यंंत ठीक आहे. नुसता संशय जरी आला कुणाला तरी वाळीत टाकतील तुला.” डॅनिअलने एका दमात बोलणं संपविलं आणि मिचमिच्या नजरेने ती अॅनाकडे पहात राहिली.
कालबाहयं संस्कृती जोपासणार्‍या ऑमिष समाजात घडलेली नाटयमय कथा


न परतीची वाट
परदेशात स्थायिक झालेलं कुटुंब. त्या देशात रुळण्याचा, सामावून जाण्याचा प्रयत्न करणारे आणि आपल्या मुलांना मोठे करणारे वडील असं परिपूर्ण सुखी चित्र. संपूर्ण वेगळया संस्कृतीत मूल वाढवणं केव्हाही कठीणच, त्यातूनही मुलीला लहानाचं मोठं करणं तर तिच्या दृष्टीने तारेवरची कसरत…
वयात आलेली मुलगी जेव्हा लग्नाला नकार दिलात तर लग्न न करताच प्रियकराबरोबर रहाण्याची धमकी देते तेव्हा काय घडतं त्या कुटुंबात? मुलीच्या मनाप्रमाणे करु शकते ती? यशस्वी होतात वडील तिला समजाविण्यात?


प्राक्तन
दोन्ही मुलं परदेशात गेल्यावर आता भारतात राहून काय करायचं या विचाराने सुमित्रा नवर्‍याचं मन वळवून अमेरिकेत मुलांसमवेत राहण्याचं पक्क करते. नोकरी करणारी मुलगी, शिकणारा मुलगा यामध्ये जयेश, सुमित्रा आपला जीव रमविण्याचा प्रयत्न करतात. ते साध्य होतय असं वाटत असतानाच दैव एकामागून एक घाला घालतं. कुणाच्याही भाळी दैवाने असं ‘प्राक्तन’ रेखाटू नये अशी प्रार्थना करावी असं वाटणारी कथा


अनेकीतली एक
“आई, एमएस झाल्यावर वाटलं होतं आता शिक्षणाला पूर्णाविराम. पण शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हेच खरं. केदार कायम बीझीच असतो. मला मात्र स्वत:ला बीझी ठेवण्यासाठी इथे आल्यापासून काहीतरी शोधावं लागतय. हेच करतेय मी वर्षानुवर्षे. एकदा तो शोध संपला की घेते मी गुंतवून स्वत:ला त्यात. पण कधीतरी प्रश्न पडतो “का असतं हे फॉरेनचं आकर्षण आपल्याला?” एका बरोबर दुसर्‍याची फरफट एवढंच समीकरण मी इथे येणार्‍या बर्‍याच जणांच्या संसारात पाहिलय. आता आताशा तर एकटीने यश, अपयश पचविण्याचा कंटाळा यायला लागलाय. केदारला हे सगळेमाझ्या मनातले खेळ वाटतात. मी कुठेच समाधानी नाही असं वाटतं त्याला. पण त्यामुळे आमच्यातला संवाद खुंटला हे लक्षात घेत नाही तो. पूर्वी खूप उत्साहाने माझ्या मनातले बेत ऐकवायची मी त्याला, तो ही तसा हो ला हो करायचा म्हणा. पण हळूहळू एकसूरी झालय आता. संसार म्हणजे दोघांनी एकमेकासाठी करायची तडजोड असेल तर मग एकाचच करिअर महत्वाच कसं ठरतं याची उमज मला अद्यापही पडत नाही. एक खर पैशापुढं सर्व गौण असतं याची प्रचिती मात्र सारखी येत राहते. शेवटी अमेरिकन लोकं म्हणतात तसं, ब्रेडविनर केदार आहे ना? त्यात बायकोची स्वप्नं दुय्यमच ठरतात. अनेकीतल्या एकीच्या मनातली ही खंत.


निर्णय
कार्तिकच्या बाबतीत आपल्याला काय आवडेल? दोनच पर्याय समोर होते. गाडी, पैसा अशासारख्या अद्ययावत, चैन अशा सुखसोयी स्वीकारून कार्तिकला ‘अमेरिकन लाईफस्टाईल’मध्ये गुरफटून टाकायचं किंवा हे सगळं नाकारून त्याचा कोवळेपणा जपायचा. काय खरं आणि काय खोटं? बसल्याबसल्या ती दोन्ही दृश्यं कल्पनेनी रेखाटत राहिली. बराच वेळ तिच्या या आवडीच्या खेळात ती जीव गुंतवत राहिली. कुठलं दृश्य प्रत्यक्षात अनुभवायचं एवढाच निर्णय घ्यायचं तिच्या हातात होतं. ते जोपर्यंत ठरत नव्हतं तोपर्यंत तिचा खेळ संपणार नव्हता. पण हाच तर तिच्या आवडीचा खेळ होता.
काय होतो निर्णय?


खेळ
“कमाल करतात ही मुलं. तरीच आक्रमक असतं, लिसाचं वागणण माझाबरोबर; सगळं ओरबाडून घेतल्यासारखं करते नेहमी. अरे, मी काय कमी करतो ह्यांच्यासाठी? कुठं गेलो की आधी तिन्ही बायकांची मुलं आणि नातवंड यांच्यासाठी उधळून दिल्यासारख्या भेटवस्तू आणत होतोच ना इतकी वर्षं? कशाला कधी नाही म्हटलं तरी हळूहळू निकोलच्या मुलांशी संबंध संपला, त्याचं दु:ख अजूनही डाचतं माझ्या मनाला.”
झटपट लग्नं तितक्याच पटकन घटस्फोट या साखळीत अडकलेल्या, मुलांच्या प्रेमाला हपापलेल्या एका साध्या सरळ माणसाची कथा


मनातलं घर
“रसिका, तू गेली नसतीस तर नक्कीच मी भाग्यवान ठरले असते. मला फक्त तुला सासरी पाठवताना होणारी पाठवणीच भावणार होती. पण शेवटी निर्णय तुझा आहे. जपून रहा. अमेरिकेत असलो तरी आपली मूल्यं, नितीमत्ता जपायचा प्रयत्न तरी करायला हवा.” भरुन आलेल्या आवाजावर ताबा मिळवण्याअधीच रसिकाने तिला अलगद थोपटलं.
सतत वाटणारी भिती आज खरी ठरली होती. तिच्या मुलीने निर्णय घेतला होता. तो बदलणं तिच्या हातात नव्हतं, आता फक्त या घरात राहून रसिकाची काळजी करणं एवढच हातात उरणार असं वाटायला लागलं होतं तिला… काय होतं तिच्या मनातल्या घराला?


प्रस्तर
आई, मुलगा आणि वडिलांच्या नात्यातील ही विचित्र गुंतागुंत. आपल्या तरुण मुलाच्या आक्रमकपणाने शीला हादरुन जाते. हा वडिलांच्या वळणावर तर नाही ना चालला हा प्रश्न तिला तिच्या संसाराकडे वळून पहायला लावतो. मुलाला मानसोपचारतज्ञाच्या मदतीने माणसात आणायचे तिचे प्रयत्न यशस्वी होत आहेत असं वाटत असतानाच पुन्हा एकदा गाडलेल्या संसारातील भुतं जागी होऊन तिच्या समोर उभी रहातात. विसरुन गेलेलं आयुष्य नव्याने सुरु करण्याची वेळ तिच्यावर येवून ठेपते. काय होतं त्या तरुण मुलाचं, वडिलांचं आणि समर्थपणे येईल त्या प्रसंगाला तोंड देणार्‍या शीलाचं?
शीला, सॅम आणि रॉनच्या आयुष्याचा प्रवास वाचा ‘प्रस्तर’ या उत्कंठावर्धक कथेत!


last-page

Advertisements